Ad will apear here
Next
पुणे येथे ‘फिरोदिया’तील विजेत्या नाटकांचे प्रयोग
‘इतिहास गवाह है’ नाटकातील काही क्षण

पुणे :
यंदाच्या फिरोदिया करंडक स्पर्धेतील विजेते ‘बीएमसीसी’चे ‘इतिहास गवाह है’ आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे ‘रिंग’ ही दोन अप्रतिम नाटके पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. वाईड विंग्ज मीडियातर्फे या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. २७ मे २०१८ रोजी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रात्री ९.३० वाजता या प्रयोगांचे सादरीकरण होईल.

पुण्यातील मानाच्या फिरोदिया करंडक या आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धेतून नव्या कलावंतांना व विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. लाईव्ह म्युझिक, नृत्य, नाट्य, अभिनय, चित्रकला, शिल्पकला व आणखीही अनेक कलांची सुरेख गुंफण असलेला नाट्याविष्कार म्हणजे ‘फिरोदिया’च्या स्पर्धेतील नाटक होय. यामध्ये कोणत्याही रेकॉर्डेड संगीताचा वापर केला जात नाही. नाटकातील कथेभोवती या सगळ्यांची गुंफण असल्यामुळे कथाही आणखी जिवंत होते. अशी नाटके पाहायला मिळणे ही नाट्यरसिकांसाठी पर्वणीच असते. या नाटकांचा प्रयोग स्पर्धेनंतर पुण्यात पहिल्यांदाच होत आहे.

यंदाच्या ‘फिरोदिया करंडक’ विजेत्या ‘इतिहास गवाह है’ या  नाटकात ऐतिहासिक विषयाला मिश्किलपणे हात घालण्यात आला आहे. या नाटकाबाबत बोलताना दिग्दर्शक ऋषी मनोहर म्हणाला, ‘प्रयोगनंतर कोणीही आमचे कौतुक करत असेल, तर आमचा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे, असे आम्ही मानतो. नृत्य, संगीत, विविध कला यांचे कॉम्बिनेशन असेलेले हे नाटक मनोरंजनात्मक आहे. त्याचबरोबर यात सध्या समाजात सुरू असलेल्या समस्यांवरही भाष्य करण्यात आले असून, अनेक अंडरकरंट्स त्यात आहेत.’

इतिहासात फारसे महत्त्व न मिळालेल्या अविराज या हिंदू राजाविषयी फिल्म लिहित असलेल्या एका लेखकाची ही कथा आहे. निर्मातादेखील अविराजाची फिल्म बनविण्यास तयार होतो. इतिहासातील संदर्भांनुसार हिंदू राजा अविराजने मुघल बादशहा इब्राहिम उल हक मुस्तफा याचा वध करून हिंदू सत्ता स्थापन केली; पण लेखनाच्या प्रक्रियेदरम्यान लेखक त्या काळात जाऊन पोहोचतो व त्याने वाचलेला इतिहास संपूर्णतः खरा नसल्याचे त्याला जाणवते. त्यानंतर त्याने लिहिलेल्या इब्राहिम व अविराजच्या पात्रांबाबत त्याच्या मनात शंका निर्माण होते. मग तो संहिता बदलतो की इतिहासावर विश्वास ठेवतो, हे जाणून घेण्यासाठी ‘इतिहास गवाह है’ पाहायला हवे. हे नाटक इतिहासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.

‘रिंग’बाबत बोलताना नाटकाचा लेखक व दिग्दर्शक संकेत पारखे म्हणाला, ‘सामान्य प्रेक्षकाला समजेल आणि आवडेल असे नाटक करायचे डोक्यात होते. ‘फिरोदिया’साठी नाटक करायचे असल्यामुळे टीममधील कलाकारांचे कलागुण ओळखून त्यानुसार नाटकाची मांडणी केली. जवळपास सगळेच नवीन कलाकार असल्यामुळे काळजी होती; पण उलट नवीन असल्यामुळे त्यांच्याकडून जास्त उर्जा मिळत गेली व त्यामुळे नाटक बसण्याची प्रक्रिया फार उत्तम झाली. आता हे सादरीकरण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे.’ नाटकाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचेही तो म्हणाला.

आजच्या धावपळीच्या जगात सर्वचजण घड्याळाच्या काट्यावर चालत आहेत. प्रत्येकाच्या मनात कशाची तरी भीती, अस्वस्थता सतत आहे, ज्यामुळे माणसाची ‘झोप’ उडाली आहे. या झोपेभोवती नाटकाची संपूर्ण कथा फिरते; पण या सर्व भाऊगर्दीत केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांसह समाधानी आयुष्य जगणाऱ्या एखाद्या माणसाच्या आयुष्यात जेव्हा एखादी छोटीशी गोष्ट येते व त्यामुळे त्याच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. त्या गोष्टीचं पुढे काय होईल, तो पुन्हा आपले जुने आयुष्य मिळविण्यासाठी प्रयत्न करेल का की तोही इतरांच्या गर्दीत सामील होऊन सामान्य होऊन जाईल, या सगळ्या मानवी भावनांचे कंगोरे उलगडणारा प्रवास म्हणजे ‘रिंग’ हे नाटक.

नाटकांविषयी :
दिवस : २७ मे २०१८
वेळ : रात्री ९.३० वाजता
स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे.
ऑनलाइन बुकिंगसाठी : www.ticketees.com
फोन बुकिंगसाठी संपर्क : ७०४०६ ०३४३३.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZMTBN
Similar Posts
‘जीवसृष्टीवरील परिणामाच्या अभ्यासासाठी जीवाश्म उपयुक्त’ पुणे : ‘जीवाश्मांकडे निसर्गात आढळणाऱ्या विस्मयकारक चमत्कृती म्हणून केवळ कुतूहलाने पाहता कामा नये. पर्यावरणातील बदलांमुळे जीवसृष्टीवर अनेक विपरीत परिणाम होत असतात. जीवशास्त्र आणि भूशास्त्र यांच्या सीमेवर असलेल्या पुराजीवशास्त्रातील जीवाश्मांचा उपयोग जीवसृष्टीवरील परिणाम अभ्यासण्यासाठी होतो,’ असे मत आघारकर संशोधन संस्थेतील निवृत्त शास्त्रज्ञ डॉ
‘डासांपासून बचावासाठी मच्छरदाणी वापरावी’ पुणे : ‘परिसरात, घरात साठलेल्या पाण्यामध्ये, अस्वच्छ्तेच्या ठिकाणी, भाताच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर डास वाढतात. कळत नकळत ते आपल्याला चावतात. यातून हिवताप, हत्तीरोग, डेंगी, चिकनगुणिया, झीका अशा गंभीर रोगांचा प्रसार होतो. डास हा माणसाचा मोठा शत्रू असून, या जीवघेण्या आजारांवर नियंत्रण आणायचे असेल, तर डासांपासून बचाव करता आला पाहिजे
डॉ. बोरकर यांच्याशी जीवाश्मांवर ‘विज्ञानगप्पा’ पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञानगप्पां’ची मालिका आयोजित करण्यात आली आहे. यातील पहिले व्याख्यान १२ जानेवारी रोजी होणार आहे.
प्रा. नलावडे यांच्याशी ‘विज्ञानगप्पा’ पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विज्ञानगप्पां’च्या मालिकेत प्रा. संजीव नलावडे संवाद साधणार आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language